आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट - भारताला फायदा

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट - भारताला फायदातेलाची किंमत शून्य झाली म्हणजे काय झाले समजून घ्या !!

आज सकाळी भारतात ज्यांचा आर्थिक क्षेत्राशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे असे लोक खडबडून जागे झाले. ते अमेरिकेतून एक खळबळजनक बातमी आली होती.  ही बातमी म्हणते की कच्च्या तेलाचा वायदे बाजारातला भाव (-४०) टक्के इतका घसरला आहे. आपल्या वाचकांचा या बाजाराशी थेट संबंध येत नसल्याने ही बातमी शक्य तितक्या सोप्या शब्दात समजावून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.


बाजारात कच्च्या तेलाचे दोन भाव सांगितले जातात. एक भाव वायदेबाजाराचा असतो, त्याला फ्यूचर्स असे म्हणतात. दुसरा 'स्पॉट' चा भाव असतो. स्पॉटचा भाव प्रत्यक्ष खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी असतो. मग वायदेबाजारात भाव पडला याचा अर्थ असा असतो की कच्च्या तेलाचे उत्पादन जोराने चालू आहे, पण येणार्‍या पुढच्या महिन्यांत हे तेल घ्यायला ग्राहकच उपलब्ध नाही.

या पडझडीने वायदे बाजारातील खेळाडूंचे मोठे नुकसान होणार आहे. आपले, म्हणजे भारताचे नुकसान होणार नाही.  कारण आपण वायदेबाजारात तेल खरेदी करत नाही. एका अर्थाने आपले परकीय चलन कमी खर्च होऊन आपली वित्तीय तूट कमी होणार आहे. मग आपण या वायदेबाजाराच्या बातमीचा अर्थ कसा लावायचा?


आपण आपले देशी कांदेबाजाराचे उदाहरण घेऊन हे समजण्याचा प्रयत्न करूया!  अर्थात हे एक काल्पनिक उदाहरण आहे हे लक्षात घ्यावे.

समजा, अतिपावसामुळे कांद्याचे उत्पादन कमी झाले आणि त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी असेल असा व्यापाऱ्यांनी अंदाज बांधला. म्हणून त्यांनी पुढचे तीन महिने चढ्या भावाने विक्री करण्यासाठी आताच कांदे खरेदी करून ठेवले आहेत. आता लक्षात घ्या, भविष्यकाळातल्या भावाचा अंदाज बांधलेला आहे, पण प्रत्यक्ष मालाची आवकही झालेली आहे.  तरीही त्यामुळे व्यापारी वायद्याची रक्कम द्यायला बांधील आहे.

याच दरम्यान अचानक बाहेरच्या देशातून कांदा येण्यास सुरुवात झाली, तर भाव पडतील पण कोसळणार नाहीत. कारण मागणी कायम आहे. आता मागणीनुसार व्यापारी कांदा साठवून ठेवायला सुरुवात करतील. पण समजा, साठवणीच्या ताकदीपलीकडे जाऊन कांदा बाजारात यायला सुरुवात झाली आणि आता अचानक मागणीच कमी झाली तर काय होईल? व्यापारी आहे मिळेल त्या भावात वायद्याचा सौदा कापून टाकतील. या प्रसंगी ज्यांनी अतोनात खरेदीचे वायदे केले आहेत, त्या व्यापार्‍यांचे प्रचंड नुकसान होईल. हे बरोबर आहे ना? काहीसं असंच जागातल्या कच्च्या तेलाच्या बाजारात झाले आहे.


करोनाच्या साथीमुळे सगळ्याच देशांनी, विशेषतः अमेरिकेसारख्या मोठ्या देशांनी तेलाचा साठा करून ठेवायला सुरुवात केली. या साठवणूकीमुळे तेलाचे भाव स्थिर राहिले. आता अमेरिकेच्या साठवणीच्या मर्यादा संपत आल्या आहेत, पण तेलाला मागणीच नाही. त्यामुळे खरेदी थांबवण्यात आली किंवा थांबण्याच्या बेतात आहे. अशा वेळी ज्यांनी भाव वाढतच जातील किंवा मागणी कायमच राहील अशा अंदाजाने वायदेबाजारात खरेदी केली असेल, ते सर्व सटोडीये तोंडावर पडतील. नेमके हेच कालच्या बाजारात झाले आहे. आज मंगळवारी एप्रिलच्या सट्ट्याचा शेवटचा दिवस असतो, त्यामुळे भाव धडाक्यात पडले आहेत. अगदी हूबेहूब नाही, पण ज्याला मुंबई सट्टा बाजारात "उंधा बदला" म्हणतात तशी परिस्थिती आहे.


या प्रसंगात आपली परिस्थिती काय असेल? आपल्याला तात्काळ फरक पडणार नाही, कारण आपण स्पॉटच्या भावात खरेदी करतो. असे असले तरी हे पडणारे भाव आपल्याला हे सांगत आहेत की येणारा काळ हा मंदीचा असेल, संसाधनांना मागणी कमी असेल. उत्पादनांना मागणी कमी असेल. या चक्रामुळे कारखाने उत्पादन कमी करतील. म्हणजेच लेबरची मागणी कमी असेल, बेरोजगारी वाढेल, बाजारभाव घटले तरी मागणी नसेल, त्यामुळे 'डिफ्लेशनरी' बाजार निर्माण होईल.

उपाय काय ?

सध्यातरी भारतात कोरोना ची साथ तुलनात्मक दृष्ट्या आटोक्यात आहे. जर आपण वेळीच सरकार सांगते आहे त्याप्रमाणे सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन केले, तर औद्योगीक वातावरण इतरांच्या तुलनेत आधी आणि लवकर सुधारेल. बाजारात उत्पादनाची मागणी वाढेल. आर्थिक चलनवलन सर्वसामान्य होण्यास मदत होईल.

आज सांगण्यासारखे इतकेच आहे की वायदेबाजार येणार्‍या काळाचे भविष्य आरशात दाखवत असतो. ही आपल्या पुराणात सांगतात तशी आकाशवाणी आहे. त्यातून बोध घेऊन पावले उचलली तर भविष्य बदलणे शक्य आहे.


शेअर मार्केट म्हणजे काय ?

Post a Comment

0 Comments